#मामाचा गाव - भाग २
भाजी मार्केटला कुणी बाजार म्हणतं कुणी मंडई. पण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. आमच्या विदर्भात त्याला बाजारच म्हणतात. लहानपणी आई बरोबर बाजारात जायला मला खुप आवडायचं. तिथे दिसणाऱ्या विविधरंगी भाज्या बघुन मन कसं प्रसन्न व्हायचं.
आमचे आजोबा म्हणजे नानांकडे गेलाे की मी त्यांच्या बरोबर आठवडी बाजारात जायचे. गावाकडचा बाजार तो आठवड्यातून एकदा गुरूवारी भरायचा. नानांचं घर बाजारच्या रस्त्यावर असल्याने सकाळ पासूनच वर्दळ सुरू व्हायची. त्या दिवशी नानाच्या दवाखान्यातही खुप गर्दी असायची. बाहेरच्या वाड्यावस्त्यांवरचे लोक बाजार करायला यायचे. कोणी पेशंट आजारी असले तरी जाऊ बाजारच्या दिवशी म्हणून गुरवारी दवाखान्यात यायचे. काहींची तब्येत नरम गरम असली तर तेही बाजारात आलो तर दाखवून देऊ म्हणून यायचे. त्यामुळे नानांना कधीकधी जेवायलाही वेळ मिळायचा नाही. नानांचं दुपारी उशीरा जेवण झाल्यावर आम्ही बाजारात जायचो. तसा बाजार खुप दुर नव्हता पण नानांना गुडघेदुखी आणि वयोमानाप्रमाणे भरभर चालता येत नसे. त्यात अनेक ओळखीचे लोक भेटायचे. "नमस्कार हो डाक्टर सायेब" म्हणून हाक मारायचे अन् विदर्भातल्या त्या टळटळीत उन्हाळ्यात मस्त गप्पा मारायचे. हा भेट तो भेट करत करत बऱ्याच वेळाने आम्ही बाजात पोहचायचो. बाजार चांगला फुलायला लागलेला असायचा. प्रत्येकाची लगबग सुरू असायची आपापलं दुकान थाटण्याची. पालं ठोकून आपापल्या भाज्या नीट मांडून ठेवायच्या , त्यावर पाणी मारायचं सगळं कसं निटनेटकं करून भाजी विकायला बसायचं. विक्रेत्यांच्या लहान मुलांचीही लुडबुड सुरू असायची. बाजार कसा रंगीबेरंगी दिसायचा. हिरव्यारंगाच्या विविध छटा असायच्या. पालकाचा कंच हिरवा तर कारल्याचा पोपटी, गवारीचा वेगळाच. तोंडल्याचा शेडींगचा हिरवा तर कलिंगडाचा काळपट हिरवा. कोथींबीर कुठेही मागे नसायची. बाजुलाच आंब्याचा पिवळाधमक रंग आणि घमघमाट सुटलेला असायचा. आंबेवाले अोरडत असायचे "घ्या रे आंबे व्हा रे लंबे". भाजी घेणाऱ्यांची वेगळीच लगबग चालू असायची. कोणी कोणी भाव करण्यात मश्गुल असायचा. मधेच एखादी वांड गाय येऊन विकायला ठेवलेली पालेभाजी उडवायची.
थोडं पुढे गेलं की शेव, चिवडयाची दुकानं असायची. गरमागरम शेव तळणं सुरु असायचं. तळणाचा वास सगळा आसमंत भरुन टाकायचा. शेजारच्या दुकानात आचारी मस्त गरमागरम जिलबी तळत असायचा. त्याच्या आजुबाजुला चारदोन माणसं कागदात गरमागरम जिलबी खाण्यात मग्न असायचे. आपसात बोलायलाही त्यांना वेळ नसायचा.
पुढे गेलं की कासाराचं दुकान लागायचं. तिथे बायाबापड्या कोंडाळं करुन बसलेल्या असायच्या. मोठाले घागरे घालून केसांना पुढच्या बाजूला चांदीचे घुंगुरांचे गुच्छ बांधनू पारंपारीक वेशभूषेत कितीतरी बायका बांगड्याच्या दुकानात दिसायच्या. त्या घुंगरांचा एक विशिष्ट मंजूळ आवाज यायचा. लहानपणी त्याचं फारच आकर्षण वाटायचं. दुकानात कितीतरी सुंदर रंगीबेरंगी बांगड्या असायच्या. पण कधी घेऊन मागायची हिम्मत झाली नाही.थोडं पुढे गेलो की विळा, कोयता, शेतीची लहान मोठी अवजारं एका ओळीत मांडून दुकानदार बसलेला असायचा. एका बाजूला कुंभाराकडचे माठ छान रचून ठेवलेले असायचे. उन्हाळ्याच्या दिवसात कुंभाराला उसंत नसायची. त्याच्या कडे सतत गिऱ्हाईक असायचं. मागच्या बाजूला माठ आणायला वापरलेले घोडे, खेचर निवांत शेपट्या उडवत रवंथ करत उभे असायचे. पलीकडच्या बाजूला पकाक पकाक असा कोबड्यांचा आवाज यायचा. तिकडे आम्ही कधी गलो नाही.
जसजशी उन्ह कलायला लागायची तसतशी लोकांची गडबड अधिकच वाढायची.आहे तो माल दर कमी करून खपवायचा प्रयत्न असायचा.आता सामानाची बांधाबांध सुरू व्हायची आणि एकेक जण हळुहळु मार्गस्थ व्हायला लागायचा. सगळा बाजार निर्जीव व्हायचा. आम्हीही परत हळूहळू मार्गी लागायचो.
बाजारातून आलो की मनाला कसं प्रसन्न वाटायचं. एवढा गोंधळ एवढा कोलाहल असूनही कधीच बाजारात जायचा कंटाळा यायचा नाही . त्या रंगीबेरंगी बाजाराने आपलं जगही रंगीबेरंगी होऊन जायचं.
नानांचा स्वभाव बोलका असल्याने अनेक लोकांशी गप्पाटप्पा व्हायच्या. नाना पेशाने डॉक्टर होते. मध्यम उंची , मजबूत बांधा , दिसायला गोरेपान, तरतरीत नाक आणि हरहुन्नरी. नाना सरकारी नोकरीत असल्याने सारखी बदली व्हायची. रिटायर झाल्यावर देऊळगावला घर घेतलं अन् तिथेच स्थाईक झाले. छोटासा दवाखाना थाटला. नाना फारच उत्साही होते. गुडघेदुखीचा त्रास असूनही रोज फीरायचे. ते स्वत: अनेक औषधे घरी बनवायचे. चवनप्राश, शतावरी कल्प, डोळ्यात घालायचे ड्रॉप्स हे सगळं करायला त्यांनी आईलाही शिकवलं होतं. नवनविन गोष्टी करून पहायला त्यांना खुप आवडायचं.
संगीत हा एक त्यांचा आवडता विषय. वयाच्या सत्तरीतही त्यांनी संगीताच्या परिक्षा दिल्या. त्याना हार्मोनियम वाजवता यायची. बरेचदा ते सकाळी उठुन गायनाचा रियाज करायचे. सोबत हार्मोनियमही वाजवायचे. त्यांच्याकडे तबलाही होता. कीर्तन तर ते अप्रतिम करायचे. एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची हातोटी असल्याने कीर्तन खुप रसाळ व्हायचे. एकदा तर गावात दवंडी पिटवली गेली की, "आज देवळात ८ वा. नाना महाराजांचे कीर्तन आहे हो s s s, सर्वांनी ठीक ८ वा देवळात जमा." आम्हाला नाना महाराज कोण ते काही कळलं नाही. नाना ८ वा कीर्तनाला जायला निघाले पण त्यांचं कीर्तन आहे हे त्यांनी सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी सांगितलं की कीर्तन खूप छान झालं आणि विचारलं की, "नानांचं कीर्तन असून तुम्ही कोणीच का आले नाही?" तेंव्हा कळलं की कीर्तन नानांचं होतं. कधीही स्वत: बद्दल न बोलणारे असे आमचे नाना.
नानांचं ड्रॉईंगही अतिशय उत्तम! त्यांना मुर्तीकलाही अवगत होती. बऱ्याच वर्षांपासून दरवर्षी ते घरीच सुबक अशी गणेश मूर्ती घडवायचे.त्याला आकर्षक रंग द्यायचे. जणुकाही मुर्ती साच्यातूनच घडविली आहे असे वाटायचे. सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करायचे. देवपूजाही जेंव्हा करायचे तेंव्हा अगदी समरसून करणार. दरवर्षी रामनवमीला नानांचं कारंजा येथे त्यांच्या रामाच्या देवळात न चुकता दरवर्षी किर्तन असायचं.
आम्हा नातवंडांचं नानांना खूप कौतुक होतं. माझा मोठा भाऊ इंजिनियर झाला मग त्याची एअर फोर्स मधे निवड झाली तर त्यांना कोण कौतुक वाटायचे. सगळ्या गावाला त्यांनी त्याचं कौतुक सांगितलं असेल. पहिल्याच नातवाचं यश बघुन ते भारावून गेले होते.
त्यांच्याकडे बघुन आपल्यालाही कामाचा उत्साह यायचा. त्याच्याकडे बघुन, "म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान" म्हणावसं वाटेल. नाना म्हणजे एवढा उत्साहाचा खळखळता झराच जणू!
नानांबरोबर संध्याकाळी आम्ही बसस्टँडवर फीरायला जायचो. रस्त्याने अनेक ओळखीचे लोक भेटायचे. आपुलकीने आमची चौकशी करायचे. गावातले सगळेच लोक चांगले होते. नानांच्या दवाखान्यात जरी आले तरी आई, मावशी यांची चौकशी केल्याशिवाय कधी जायचे नाही. कधी आम्ही आजारी पडलोच तर तांब्याभर दुध घेऊन भेटायला येणार आणि "बाई शहरातल्या पोरी, नाजुक असत्यात त्यांना सवय नसते कामाची, कोनाची तरी दिठ लागली असंल" असं म्हणून कानावर कडाकड बोटं मोडून दृष्ट काढणार. दृष्ट लागणं न लागणं गोष्ट वेगळी पण तो आपलेपणाचा ओलावा तोच मनाला भावतो.
मला आठवतं मामाच्या लग्नाच्या वेळेला कितीतरी लोकांकडे केळवणाला आम्ही मामा बरोबर जायचो. आपल्या ऐपती प्रमाणे ज्याला जे जमतील ते पदार्थ प्रत्येकाने खाऊ घातले. पण त्यांची ती आपुलकी, आदरातीथ्य बघुन त्या लहान वयातही भारावून जायचो आम्ही. स्वत: कडे असो नसो देण्याची वृत्ती होती. मन मोठं होतं. आज असे फारच कमी लोक पहायला मिळतात.
कोणाकडेही लग्न कार्य असलं की सगळा गाव मदतीला जायचा. जसं काही आपल्याच घरचं कार्य असल्यासारखे कामं करायचे. घरासमोर मांडव टाकून लग्नं व्हायची. आजूबाजूच्या लोकांकडून भांडी आणली जायची. आजुबाजूच्या बायाबापड्या एकत्र येऊन लग्नातलं जेवण बनवायच्या. एकीचं उत्कृष्ट उदाहरणच होतं ते. कमी खर्चातही कार्य कसं छान पार पडायचं. एकीचे बळ आपल्या वागण्यातून दाखवून दिलं त्यांनी.
गावात रोज रात्री मंदिरात हरीपाठ वाचला जायचा. घरातली जुनी जाणती माणसं हरीपाठाला जायची. आमच्या मोठीआईला घरात एवढं काम असूनही ती हरीपाठाला न चुकता जायची.
गावातील शिक्षक, गोल गरगरीत माठ, नक्शीदार सुरया, कुंड्या बनविणारे कुंभारदादा, सुबकपणे सगळ्या वस्तू बनवणारे सुतारमामा, लोखंडी घण घालून अनेक वस्तु बनवणारे लोहार मामा, तर ज्वारीच्या धांड्यांपासून बैलगाडी बनवणारी लहान मुले, सगळेच आपापल्या कामात तरबेज. प्रत्येक व्यवसाय जवळून पाहण्याची संधी मिळाली. किती किती गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या. देऊळगावसारख्या छोट्या गावाने खुप काही शिकवले. कदाचीत त्या वयात त्याचं महत्त्व कळलं नसेल, पण आज मात्र कळतय. पण तेंव्हाही गाव सोडून जातांना जड मनानेच सोडावं लागायचं आणि आज म्हणाल तर शहरापेक्षा गावाचीच ओढ जास्त वाटते. गावाचा विकास झाला तरचं देशाचा विकास होणार हे नक्की. देऊळगावचा विषय निघाला की या ओळी नक्कीच म्हणाव्याशा वाटतात.
गाव माझा साधा सुधा
वाहे निर्मळ पाणी
घरा मध्ये सुख नांदे
डोले तुळस अंगणी
टाळ मृदुंगाच्या तालात
चाले माऊलीचा जप
माणसात देव वसे
देव्हाऱ्यात माय बाप
सौ. मंजुषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करावी ही विनंती