आज सकाळी आमच्या आळीत दोन माणसं आली होती. सोबत एक छानसा मोठी शिंग असलेला डौलदार आणि सजवलेला बैल होता. ती माणसं खड्या पहाडी आवाजात गाणी म्हणत होती आणि सोबत ढोल वाजवत होती. त्यामुळे सहाजिकच लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जायचं आणि लोकं घरातून डोकावून बघत होते. जो त्यांच्याकडे बघेल त्याचं ते भविष्य सांगायला लागायचे. तेही खूप मोठ्याने सगळ्या आजुबाजुच्या बिल्डिंगमध्ये आवाज जाईल एवढ्या मोठ्या आवाजात. ते खरे होते की खोटे त्यांचे त्यांनाच माहिती. जे त्यांना पैसे आणि तांदूळ वगैरे देत होते त्यांचही भविष्य सांगायचे. तुम्हाला १ च मुल आहे, तुम्ही खूप कष्ट केले पण तुमची कोणाला किंमत नाही. तुम्ही लोकांचं खूप करता पण तुम्हाला यश येत नाही वगैरे वगैरे सगळं सगळ्यांना लागू होईल असं सांगत होते. मला पैसे देण्याची खूप इच्छा झाली. या करोनाच्या काळात लोकांची खूप सर्वांचीच खूप दुर्दशा झाली. आपणही कोणालातरी मदत केली पाहीजे असही क्षणभर वाटून गेलं. मी शेजारून जाताना त्यातल्या एका माणसाने, "दीदी द्या की हो काहीतरी" असंही म्हटलं. इच्छा असूनही मी त्याला काहीच दिले नाही कारण मी काही दिले असते तर त्याने लगेच भविष्य सांगायला सुरुवात केली केली असती. आणि या बाबतीतला माझा अनुभव फारच वाईट होता. एकदा असच 15 ऑगस्ट ला मी झेंडा वंदन करून घरी आले तर एक वासुदेव आमच्या कॉलनीत पहाटेची गाणी म्हणत चिपळ्या वाजविताना दिसला. त्याचा आवाज खूप गोड होता. नेहमी आमच्या कॉलनीत यायचा पण त्याच्या आवाजाला कधी दादही देता आली नव्हती अन् त्याला काही देताहीआलं नव्हतं. म्हणून म्हटलं आज त्याला काही तरी द्यावं. म्हणून मी गाडी पार्किंग मध्ये लावली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला पैसे दिले. त्यानेही असंच भविष्य सांगायला सुरुवात केली की तुम्ही खूप कष्टाळू आहात, तुम्ही सगळ्यांचं करता पण तुम्हाला यश येत नाही वगैरे वगैरे....मीही ही हुरळून गेले. मला वाटलं हा फारच परफेक्ट भविष्य सांगतोय. असं करत करत त्याने मला सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा अपघात होण्याची शक्यता आहे. मिस्टर हायवे वरून रोज ५५-६० किमी टू व्हीलर वर जा- ये करायचे. मग मी जरा घाबरले कारण आधीचं जे काही त्याने सांगितलं ते जर खरं असेल तर हेही खरं होईल अशी मला भीती वाटली. मग तो म्हणाला, "काही दानधर्म केला तर कदाचित तुमच्यावरच संकट टळेल." मी म्हटलं ,"ठीक आहे करेन मी दानधर्म." मनातल्या मनात काहीतरी दानधर्म करावा असंही मी ठरवून टाकलं. पण तो म्हणाला, "तसं नाही आताच काहीतरी दानधर्म करा नाही तर तुमच्यावर अरिष्ट येईल." मग त्याची चाल हळूहळू माझ्या लक्षात यायला लागली. मग लक्षात आलं की याला माझ्याकडून काहीतरी अपेक्षित आहे. म्हणून हा मला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने सरळ सरळ मला काहीतरी द्या म्हटलं असतं तर मी दिलहि असतं पण त्याच्या चलाखी चा मला फार राग आला. लोकांच्या भावनांशी खेळून पैसे मिळवण कितपत योग्य होतं?? आणि त्या दिवसापासून ठरवून टाकलं की द्यायचं असेल तर एखाद्या गरिबाला, गरजूला किंवा भिकाऱ्याला द्यावे. असल्या नाटकी भविष्य वाल्याला नक्कीच नाही.
सौ. मंजूषा गारखेडकर ©®