समाजऋण
एक दिवस दुपारी अश्विन माझ्याकडे क्लास लावायला आला. तो नववीला होता. त्याच्या हाताला प्लास्टर होत. त्याने क्लासला येण्याची इच्छा दर्शवली पण त्याच्यासोबत कोणीही नव्हते. अश्विन चांगला सालस होता त्यामुळे मी त्याला दुसऱ्या दिवशीपासून क्लासला येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पासून तो क्लासला येऊ लागला. एक दिवस त्याला घ्यायला त्याची आई आली. त्याच्यासमोर क्लास बद्दल जुजबी बोलणं झालं. ती त्याला घेऊन बाहेर गेली व त्याला बाहेर ठेऊन ती परत आली. "टिचर अश्विनच्या अभ्यासाकडे लक्ष द्या बरका. त्याच्या शाळेतही खूप दाड्या होतात." त्याची आई म्हणाली. हो म्हणून मी त्यांना आश्वासन दिले. मग त्या म्हणाल्या, "तसं नाही टीचर अश्विन कधी कधी खुप थकतो. यामुळे त्याला काहीच करायला जमत नाही . अभ्यासही नाही मग तो अभ्यासात मागे पडतो. कॅन्सर आहे ना त्याला." हे ऐकून माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी म्हणाले,"अरे बाप रे मला नव्हतं माहिती." "टीचर म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले त्याची शाळा बुडल्यामुळे त्याचा अभ्यास होत नाही, म्हणून त्याला क्लास लावला आहे. तुम्ही प्लीज त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याची ट्रीटमेंट सुरू आहे."
अश्विनची ट्रीटमेंट सुरू होती पण फारसा फायदा झाल्याचं काही दिसत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करायला सांगीतलं. खर्च आवाक्या बाहेरचा होता. अश्विन चे आई-वडील मध्यमवर्गीय होते. एवढा खर्च करणे त्यांना कठीण होते. त्यामुळे अश्विन च्या आईने इतर ठिकाणाहून काही मदत मिळते का पाहायला सुरुवात केली. काही संस्थांनी मदत केली. माझ्या ट्यूशन मधल्या मुलांनी स्वत:हून मदत गोळा केली. आम्ही सर्वांनी सगळ्यांची मदत घेऊन जमवलेले पैसे अश्विनला द्यायला गेलो. त्याच्या ऑपरेशनची तारीख ठरली होती ट्युशनच्या मुलांनी खारीचा वाटा उचलला होता. खुप कौतूक वाटले मुलांचे. अश्विन कडे गेलो तर तो बाहेरच्या खोलीत आराम करत होता. आम्हाला पाहून त्याला खूप आनंद झाला. मुलं एकमेकांशी भरभरून बोललीे. अश्विनला ऑपरेशनसाठी शुभेच्छा देऊन आम्ही परत आलो.
ऑपरेशन होईपर्यंत अश्विनच्या आईचा जीव टांगणीला लागला होता. ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हटल्यावर आई बाबा दोघही खुप खूष झाले. आम्हाला कळल्यावर आम्हालाही आनंद झाला. पण त्याची खूप काळजी घ्यावी लागणार होती. कारण ऑपरेशनच्या वेळी त्याची इम्यूनिटी खूप कमी केल्याने इन्फेक्शनचा धोका होता. म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते जिथे फक्त डॉक्टर किंवा नर्सच जाऊ शकत होते. आई बाबा बाहेर बसून अश्विनची काळजी करत असायचे. अश्विन रुम मध्ये एकटाच असायचा. बोलायला कोणी नव्हतं. तेंव्हा मोबाईलही नव्हते. एकटाच विचार करत पडलेला असायचा.
एक दिवस त्याच्या शेजारच्या विलगीकरण कक्षातला पेशंट गेला. त्यावेळेस त्या पेशंटच्या रूममधले आवाज, डॉक्टर , नर्सेस यांची पळापळ, पेशंटचं तडफडणं आणि मग नातेवाईकांची रडारड हे ऐकून तो फारच घाबरला. त्याच्या जागेवरून सगळं अनुभवलं त्यानं. मनातून तो पार कोसळला. तो एकदाच नर्सला म्हणाला की सगळ्यांचं असच होतं का?? त्याची तब्येत त्या दिवसापासून ढासळायला लागली. तो उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला. डॉक्टरांनाही कळेना की असं का झालं अचानक ते.
दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती खुपच खालावली आणि त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचे आईवडील पार कोसळून गेले. मृतदेह मुंबईहून घरी आणला. मोठ्या आशेन लेकराला नेलं होतं मुंबईला. आम्ही त्याच्या आईला भेटायला गेलो तर काय बोलावं ते ही कळत नव्हतं. बिचारी माऊली तिचा एकुलता एक लेक गमाऊन बसली होती. खूप वाईट वाटलं. पण आपल्या हातात काहीच नसतं. आमच्या क्लास मध्ये त्याची रोज एकदातरी आठवण निघायची.
बरेच दिवस निघून गेले. मी एकदा बस ने येतांना बस मध्ये अश्विनची आई भेटली. बरीच सावरली होती. कशा आहात विचारल्यावर म्हणाली, "टिचर मी आता अशा आजारी अन् ऐपत नसलेल्यांना आर्थीक मदत मिळविण्यासाठी अन् कँन्सर पिडीतांसाठी काम करते. इतरांच्या वाट्याला तरी माझ्यासारखं दु:ख नको." तीने मला स्टेपल केलेली 4/5 पानं मला दिली त्यावर कँन्सर हॉस्पीटलची माहीती, पत्ते, अनेक डाक्टरांचे नंबर, वेगवेगळ्या टेस्ट कुठे, कशासाठी केल्या जातात व त्याचा अंदाजे खर्च इ सर्व माहीती होती. (आज हे सगळं गुगलला सहज उपलब्ध असेल पण तिनं जमवलेली माहीती इतर कोणालातरी उपयोगी पडावी हीच तिची इच्छा होती) स्वत:च्या एकुलत्या एका मुलाचं दु:ख बाजूला ठेऊन दुसऱ्याचं दु:ख डोईवर घ्यायला निघाली. धन्य ती माऊली..... अन् धन्य तिचे विचार...... आपोआपच मी तिच्यासमोर नतमस्तक झाले.
© सौ. मंजूषा गारखेडकर