Saturday, 3 October 2020

भविष्य

 


  

  आज सकाळी आमच्या आळीत दोन माणसं आली होती. सोबत एक छानसा मोठी शिंग असलेला डौलदार आणि सजवलेला बैल होता. ती माणसं खड्या पहाडी आवाजात गाणी म्हणत होती आणि सोबत ढोल वाजवत होती. त्यामुळे सहाजिकच लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जायचं आणि लोकं घरातून डोकावून बघत होते. जो त्यांच्याकडे बघेल त्याचं ते भविष्य सांगायला लागायचे. तेही खूप मोठ्याने सगळ्या आजुबाजुच्या बिल्डिंगमध्ये आवाज जाईल एवढ्या मोठ्या आवाजात.  ते खरे होते की खोटे त्यांचे त्यांनाच माहिती. जे त्यांना पैसे आणि तांदूळ वगैरे देत होते त्यांचही भविष्य सांगायचे. तुम्हाला १ च मुल आहे, तुम्ही खूप कष्ट केले पण तुमची कोणाला किंमत नाही. तुम्ही लोकांचं खूप करता पण तुम्हाला यश येत नाही वगैरे वगैरे सगळं सगळ्यांना लागू होईल असं सांगत होते.  मला पैसे देण्याची खूप इच्छा झाली. या करोनाच्या काळात लोकांची खूप सर्वांचीच खूप दुर्दशा झाली. आपणही कोणालातरी मदत केली पाहीजे असही क्षणभर वाटून गेलं.  मी शेजारून जाताना त्यातल्या एका माणसाने, "दीदी द्या की हो काहीतरी" असंही म्हटलं.  इच्छा असूनही मी त्याला काहीच दिले नाही कारण मी काही दिले असते तर त्याने लगेच भविष्य सांगायला सुरुवात केली केली असती.  आणि या बाबतीतला माझा अनुभव फारच वाईट होता. एकदा असच 15 ऑगस्ट ला मी झेंडा वंदन करून घरी आले तर एक वासुदेव आमच्या कॉलनीत पहाटेची गाणी म्हणत चिपळ्या वाजविताना दिसला. त्याचा आवाज खूप गोड होता. नेहमी आमच्या कॉलनीत यायचा पण त्याच्या आवाजाला कधी दादही देता आली नव्हती अन् त्याला काही देताहीआलं नव्हतं. म्हणून म्हटलं आज त्याला काही तरी द्यावं. म्हणून मी गाडी पार्किंग मध्ये लावली आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला पैसे दिले. त्यानेही असंच भविष्य सांगायला सुरुवात केली की तुम्ही खूप कष्टाळू आहात, तुम्ही सगळ्यांचं करता पण तुम्हाला यश येत नाही वगैरे वगैरे....मीही ही हुरळून गेले. मला वाटलं हा फारच परफेक्ट भविष्य सांगतोय. असं करत करत त्याने मला सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा अपघात होण्याची शक्यता आहे. मिस्टर हायवे वरून रोज ५५-६० किमी टू व्हीलर वर जा- ये करायचे. मग मी जरा घाबरले कारण आधीचं जे काही त्याने सांगितलं ते जर खरं असेल तर हेही खरं होईल अशी मला भीती वाटली. मग तो म्हणाला, "काही दानधर्म केला तर कदाचित तुमच्यावरच संकट टळेल." मी म्हटलं ,"ठीक आहे करेन मी दानधर्म." मनातल्या मनात काहीतरी दानधर्म करावा असंही मी ठरवून टाकलं. पण तो म्हणाला, "तसं नाही आताच काहीतरी दानधर्म करा नाही तर तुमच्यावर अरिष्ट येईल." मग त्याची चाल हळूहळू माझ्या लक्षात यायला लागली. मग लक्षात आलं की याला माझ्याकडून काहीतरी अपेक्षित आहे. म्हणून हा मला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने सरळ सरळ मला काहीतरी द्या म्हटलं असतं तर मी दिलहि असतं पण त्याच्या चलाखी चा मला फार राग आला. लोकांच्या भावनांशी खेळून पैसे मिळवण कितपत योग्य होतं?? आणि त्या दिवसापासून ठरवून टाकलं की द्यायचं असेल तर एखाद्या गरिबाला, गरजूला किंवा भिकाऱ्याला द्यावे. असल्या नाटकी भविष्य वाल्याला नक्कीच नाही.

सौ. मंजूषा गारखेडकर ©®

Wednesday, 23 September 2020

बंडी उलार

 


# बंडी उलार

       परवाच्या दिवशी बापूराव ‌ आलते. ते माह्या बुढ्‌याले म्हने का बाप्पा पोराचं लगन करतु का न्हाय? माहा बुढा काई नावंच नाई काढे. बापुराव म्हने का पोरगं कमावते तं काहून न्हाई करत लगन? पायजा बापा नाईतर थ्योच ईल ठरून. मंग बसाल बय बय करत. बुढा आयकत हुता. मंग इचार करून म्हने का करून टाकू काय कराचं. म्या सारं आयकत व्हतो. माह्या तं मनात उकळ्या फुटत व्हत्या. चाला म्हनलं....बुढा लग्नाले तयार तं झाला....बापुरावनं बुढ्याले यका पोरीचा फटू दाखवला.  बुढ्यानं फटू पायला अन् म्हने का बापुराव, "पोरगी कधी पाहाची, ते ठरूनच टाका.” मले तं वाटे का आत्ताच जाऊन पोरगी पाहून याव. पन माहा बुढा लयच खऊट. मले तं त्यानं फटू बी नाई दाखवला.


       बापुरावनं पोरगी पाहाचा कारेक्रम ठरून टाकला . येनाऱ्या इतवारी ठरला. मले वाटे बापा इतवार येते का नाई ? म्या म्हनतो इतवारची वाटच कायले पाहा लागते ? आजच जाऊन पोरगी  पाहाची अन् टाकाचं ठरून . मंग उशीर च उशीर होत जाते. पन ह्या बुढाले सांगन कोन?? त्याले टाईम नसन तं म्याच आलो असतो पाहून. इतवार आला कसाबसा. मंग म्या.... माई माय.... माहा बुढा.... सरसोती मावशी....बापुराव.... माहये दोन भाऊ आन् माही बईन अन् जवाई आन् दोनचार लहान पोरं  गेलो पोरगी पहाले. म्या तं मस्त पांढऱ्या रंगाची प्यांट अन् गुलाबी शर्ट घातला. अन् आरसा घिऊन न्हानीघरात गेलो. अन् तिथं तोंडाले किरीम गिरीम लावली अन् पावडरई लावलं. कालच्यालाच माह्या दोस्तानं फेशियल का काय ते पन करून दिलतं. आज म्या तं मस्त घोटून दाढी केली. म्हनलं पोरीनं म्हनलं पायजे का पोरगं त लईच मस्त हाय.  

       मंग आमी सारेजन पोरीच्या घरी गेलो. त्यांच्या घरी बिछाईत गिछाईत करून ठेवली होती. सारेजन बसले खाली बसले बिछायतीवर.  बापा अन् मलेच बसायले जागा न्होती. मंग म्या उभाच रायलो. तं पोरीच्या बाप म्हनते का बसानं तुमीबी त्यानं मले खुर्चीच आनुन देल्ली. सारे खाली बसले न् नवरदेव खुर्चीवर. माह्या बाजूले बी यक खुर्ची ठिवली तं मले वाटे का पाेरीनं इथच बसाव. मले तं लग्नात बसल्यावानी वाटे. 

       सारेजन बोलत व्हते न् म्या नुसताच बसून व्हतो. तं आतून एक पोरगं आलं. इऊन माह्या बाजूच्याच खुर्चीत बसलं. म्या म्हनलं ह्याले हेच जागा भेटली का? पन मी म्हंतो याचं हितं कामच काय हाय? बसलं तं बसलं. माह्याशीच बोले. तुमी काय शिकले? कुठं नोकरी करता? मी म्हनतो याले कराचंच काय? पोरगी बी येत न्हवती. त्या पोराचे केस तं पोरी सारखेच होते बापा. बापकट का काय म्हनते तसे. अन कानातई डूल व्हते. मले तं ते पोरगं हिलन वानी वाटे.  शिनेमात नसते काय हिरो हिराईनच्या मधी मधी करते तसं. हिलन म्हनाव त नाजुकई वाटे. त्या पोरानं मले इचारलं , "काऊनजी तुमाले सैपाक गिपाक येते का नाई? बायकु बेमार पल्ली तं?” मले त वाटे का उठून त्याच्या कानशिलात द्याव पन काय करता , लगन करायचं व्हतं नं. म्या म्हनलं, “ नाई बा आपुन सैपाक गिपाक नसतो करत. हाटेलात जाऊन जिवून इऊ.” 

थे पोरगं लयच चबर चबर करे आन् मले प्रश्न ईचारे.....मले बोलाचं नव्हतो तरी येऊन जाऊन माह्याशिच बोले.असं वाटे का त्याले मनाव का जाय ना तुले काई कामं धंदे नही काय??? पन.....

      थोडा येळ झाला तसा  बुढा म्हने का, "आना पोरीले भाईर".  तं पोरीचा बाप म्हन्ते का, "ते काय आमची पोरगी पोराच्या बाजूलांच तं बशेल हाय. आमची पोरगी चांगली शिकेल हाय. बी.ए झालीना थे.” आमी तं हपचकच झालो बापा. थ्यो पोरगा वाटला थेच पोरगी होती. म्याच तिच्याकडे पाहून लाजत जाओ मंग. मंग म्या तिले टक लाऊनच पहात जाओ. माह्या बुढ्याले काई थे पोरगी पटलीच नवती. तिची ती फ्याशन का काय बुढ्याले नवतीच आवडली. बुढा तिले इचारे "काहून तुमच्या कालेजात हेच शिकोते काय? " तं ते पोरगी म्हनते , “त्याले फ्याशन म्हनते. ते तुमाले नाई समजनार. त्याले कालेजात जा लागते.” मंग बुढ्याचं डोसकच फीरलं. पन मले तं पोरगी लईच भायली. मले वाटे का पोरीले घिऊन फिराले जाव. माही बईन इचारत व्हती पोरीले का, “ तुले काय काय आवडते?” तं पोरगी म्हने, “ मले तं शिनेमा पहाले, फिराले, अन् फ्याशन करालेच आवडते बाप्पा.” तं माहा बुढा खवळलाच, म्हने का पोरगी काई सरळ दिसत नाई. माहा जीव तं खालीवर व्हये. मले तं पोरगी लयच भायली व्हती ना. म्या मनातंच म्हनलं अशी पायजे बां पोरगी हिराेईनी वानी. माया सारख्या हिरोले तं हेच शोबते.


       बोलता बोलता आमच्या साठी पोयाच्या बशा भरून आल्या. पोरं लई दांगडो करत व्हते. त्यानले लयीच मजा येत व्हती.... आमच्या मामाचं लगीन हाय म्हनून लयीच हरखली व्हती. ईकून तिकून पयत व्हते. तितक्यात यक बाई पोयाच्या बशा घिऊन आली. तं त्यायच्या कडच्या पोराचा लागला धक्का आन सगया पोयाचा सत्यानाश.....सारा जनु पोयाचा सडाचं पल्ला. माया बुढ्याले तं  लईच संताप आला.... पन तो गप गुमान बसला.... पन थ्या पोरीच्या बापानं थ्या पोराले दिली थोपकाडीत लाऊन. मंग ते पोरगं लागलं बोंबलाले मने साऱ्या लोकाई समोर माया वाला अपमान केला तुमी. अन् लागला लाथा झाडाले. त्यानं तं च्या च्या कपाले देल्ली लात झाडून.त कप डायरेक बुढ्याच्या आंगाव आला. आता बुढ्याचा संताप इचरूच नका. बुढ्याचं तोंड सगर भाजलं.... मंग सारे बुढ्याकडे वयले. कोनी म्हने ठंड पानी मारा तं पोरीच्या भावानं बुढ्याच्या तोंडाव ठंड पानीच फेकलं. बुढा लईच खवयला.  बुढा संतापानं लालेलाल झाला. मने ईथ थांबाचच नाय कोनी चाला आता...बुढ्याचे सारे कपडे वल्ले झालते. मंग त्यो खवळनार नाय तं काय?? पन तरी मले वाटे का इथच थांबाव. मंग थ्या पोरीच्या बापान बुढ्याले त्याच्यावाले कपडे देल्ले बदलाले. तं बुढा म्हने की मी नसतो घालत लोकाईचे कपडे. मंग त्यायनं यक नविन धोतराचं पान देल्ल बुढ्याले नेसाले अन् पोरीच्या भावाचा सदरा देल्ला. त्यो ढगाळ घालून बुढा तं निव्वळ बुजगावन दिशे. मले तं त्याले पायलं तं हासूच ये. संतापलेल्या बुढ्याले पोरीच्या बापानं लई समजावलं मंग त्यो जरा शांत झाला. मंग कोनतरी गायीचं तुप फासलं बुढ्याच्या तोंडाले.पोरांचा दांगडो तं काई कमीच व्हत नवता. मंग बुढा लयच भडकला. मंग आलो आमी निघुनशान घरी.

         घरी आलो तं बुढा बापुराव वरंच गरम झाला. काई पोरी दाखवता तुमी तं. पयले सांगतलं असतं तं आलोच नसतो पोरगी पहाले. कोनालेच पोरगी पसंत पडली नाय. मंग माहं तोंडच उतरलं. तशी बुढी म्हने पोराले तं इचारा काय म्हंते तं. बुढा म्हने पोराला कायले इचारा लागते. आपुन ठरू ते पोरगा करन. मंग म्याच म्हनलं, " म्या लगन करन तं थ्याच पोरीशी नाईतर म्या नाई करनार.” म्या असं म्हनलं तं बुढा आंगावर धाऊनच आला. मंग म्या गेलो निघुन घरातून. जाऊन बसलो डोंगरावरच्या रानात. मले तं सारीकडे हिरवं हिरवंच दिशे अन् शिनेमातल्या वानी फुलं दिशे. आनं ते पोरगी गानं म्हने “परदेशी परदेशी जाना नही”. अन् म्या गेलो धावतच पोरीच्या मांगं मांगं. जवा समोरच्या बाभळीच्या झाडावर आपटलो न् नाक ठेचलं तवा समजलं का हे काई शिनेमातलं बगीचा न्हाई. राती पावतो तिथंच बसलो. पोटात लय कावळे कोकलत व्हते पन समोर पोरगी दिसली का मले थंड थंडंच वाटे. रातचाला गेलो घरी. सारे कामातच व्हते. म्या उशीत तोंड खुपसून झोपूनच रायलो. मग माय आली चल बाबु भाकरतुकडा खाऊन घे म्हनून सांगायले. पोरगं सकायपासून उपाशी हाय. म्या म्हनलं मले न्हाई जेवाचं. पयले थ्या पोरीशी लगन ठरून दे मंगंच म्या जेवन. म्या नाई जवलो तं बुढी बी उपाशीच झोपली. म्या तं राती मस्त सपान पायलं. बुढा - बुढी राती जागेच व्हते. कायतर खुसूरपुसूर करत व्हते. रातो गुपचूप जाऊन भाकर खाव म्हनलं तं , हे जागेच.

      म्या सकाय वकाय उठलो न् मायले म्हनलं जातो म्या घर सोडून. मले नाई रहाचं ह्या घरात. तं बुढा म्हनते, “ काऊन, जास्तं माज आलां का? माज आला अशीन तं जाय, राहाशीन तं तथ्या पोरीशी लगन लावून देतो.” राती बुढीनं बुढ्याले समजावलं का पोरगी कशीई असली तं इथं आली का सुधारून घिऊ. बुढा कसाबसा तयार झाला. मले तं बुढा तयार झाला उडावंच वाटे. वाटे आत्ताच लगन करून यावं.

       बुढ्याने मंग बापुरावले सांगावा धाडला. बापुराव आल्यावर त्याईले सांगतलं का पोरगा तं म्हनते का थेच पोरगी पायजे. तुमी असं करा पोरीच्या घरी जाऊन सांगा आमाले पोरगी पसंत हाय. मंग टीळा ठरून टाकू. बापुराव तं पाहातच रायले. थे गेले पोरीकडं. तिथं बोलून गिलून घराकडे येताना दिसले. म्या म्हनलं टीळ्याची तारीखई ठरून आले असन. म्हनून म्या कान दिऊन आयकत व्हतो. तं बापुराव म्हने का, “ पोरीले पोरगं पसंत नाई. थे म्हनते का त्या पोराले काई समजतच नाई.”

मले तं थोबाडीत मारल्यावानीच झालं. मंग माहा बुढा मले म्हनते का, " करनं बाबु लगन थ्याच पोरीशी लगन, आता काहून तोंड वेंगाडून बसला?”

झाली ना माही बंडी उलार!



सौ मंजूषा गारखेडकर ©®





Sunday, 30 August 2020

समाजऋण

  समाजऋण 


एक दिवस दुपारी अश्विन माझ्याकडे क्लास लावायला आला. तो नववीला होता. त्याच्या हाताला प्लास्टर होत. त्याने क्लासला येण्याची इच्छा दर्शवली पण त्याच्यासोबत कोणीही नव्हते. अश्विन चांगला सालस होता त्यामुळे मी त्याला दुसऱ्या दिवशीपासून क्लासला येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पासून तो क्लासला येऊ लागला. एक दिवस त्याला घ्यायला त्याची आई आली. त्याच्यासमोर क्लास बद्दल जुजबी बोलणं झालं. ती त्याला घेऊन बाहेर गेली व त्याला बाहेर ठेऊन ती परत आली. "टिचर  अश्विनच्या अभ्यासाकडे लक्ष द्या बरका. त्याच्या शाळेतही खूप दाड्या होतात." त्याची आई म्हणाली. हो म्हणून मी त्यांना आश्वासन दिले. मग त्या म्हणाल्या, "तसं नाही टीचर अश्विन  कधी कधी खुप थकतो. यामुळे  त्याला  काहीच करायला जमत नाही . अभ्यासही नाही  मग तो अभ्यासात मागे पडतो. कॅन्सर आहे ना त्याला." हे ऐकून माझ्या पायाखालची वाळूच सरकली. मी म्हणाले,"अरे बाप रे मला नव्हतं माहिती." "टीचर म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले त्याची शाळा बुडल्यामुळे त्याचा अभ्यास होत नाही, म्हणून त्याला क्लास लावला आहे. तुम्ही प्लीज त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याची ट्रीटमेंट सुरू आहे."

           अश्विनची ट्रीटमेंट सुरू होती पण फारसा फायदा झाल्याचं काही दिसत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करायला सांगीतलं. खर्च आवाक्या बाहेरचा होता. अश्विन चे आई-वडील मध्यमवर्गीय होते. एवढा खर्च करणे त्यांना कठीण होते. त्यामुळे अश्विन च्या आईने इतर ठिकाणाहून काही मदत मिळते का पाहायला सुरुवात केली. काही संस्थांनी मदत केली. माझ्या ट्यूशन मधल्या मुलांनी स्वत:हून मदत गोळा केली. आम्ही सर्वांनी सगळ्यांची मदत घेऊन जमवलेले पैसे अश्विनला द्यायला गेलो. त्याच्या ऑपरेशनची तारीख ठरली होती ट्युशनच्या मुलांनी खारीचा वाटा उचलला होता. खुप कौतूक वाटले मुलांचे. अश्विन कडे गेलो तर तो बाहेरच्या खोलीत आराम करत होता. आम्हाला पाहून त्याला खूप आनंद झाला. मुलं एकमेकांशी भरभरून बोललीे. अश्विनला ऑपरेशनसाठी शुभेच्छा देऊन आम्ही परत आलो. 

        ऑपरेशन होईपर्यंत अश्विनच्या आईचा जीव टांगणीला लागला होता. ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हटल्यावर आई बाबा दोघही खुप खूष झाले. आम्हाला कळल्यावर आम्हालाही आनंद झाला. पण त्याची खूप काळजी घ्यावी लागणार होती. कारण ऑपरेशनच्या वेळी त्याची इम्यूनिटी खूप कमी केल्याने इन्फेक्शनचा धोका होता. म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते जिथे फक्त डॉक्टर किंवा नर्सच जाऊ शकत होते. आई बाबा बाहेर बसून अश्विनची काळजी करत असायचे. अश्विन रुम मध्ये एकटाच असायचा. बोलायला कोणी नव्हतं. तेंव्हा मोबाईलही नव्हते. एकटाच विचार करत पडलेला  असायचा.

         एक दिवस त्याच्या शेजारच्या विलगीकरण कक्षातला पेशंट गेला. त्यावेळेस त्या पेशंटच्या रूममधले आवाज, डॉक्टर , नर्सेस यांची पळापळ, पेशंटचं तडफडणं आणि मग नातेवाईकांची रडारड हे ऐकून तो फारच घाबरला. त्याच्या जागेवरून सगळं अनुभवलं त्यानं. मनातून तो पार कोसळला. तो एकदाच नर्सला म्हणाला की सगळ्यांचं असच होतं का?? त्याची तब्येत त्या दिवसापासून ढासळायला लागली. तो उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला. डॉक्टरांनाही कळेना की असं का झालं अचानक ते. 

       दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती खुपच खालावली आणि त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचे आईवडील पार कोसळून गेले. मृतदेह मुंबईहून घरी आणला. मोठ्या आशेन लेकराला नेलं होतं मुंबईला. आम्ही त्याच्या आईला भेटायला गेलो तर काय बोलावं ते ही कळत नव्हतं. बिचारी माऊली तिचा एकुलता एक लेक गमाऊन बसली होती. खूप वाईट वाटलं. पण आपल्या हातात काहीच नसतं. आमच्या क्लास मध्ये त्याची रोज एकदातरी आठवण निघायची. 

           बरेच दिवस निघून गेले. मी एकदा बस ने येतांना बस मध्ये अश्विनची आई भेटली. बरीच सावरली होती. कशा आहात विचारल्यावर म्हणाली, "टिचर मी आता अशा आजारी अन् ऐपत नसलेल्यांना आर्थीक मदत मिळविण्यासाठी अन् कँन्सर पिडीतांसाठी काम करते. इतरांच्या वाट्याला तरी माझ्यासारखं दु:ख नको." तीने मला स्टेपल केलेली 4/5 पानं मला दिली त्यावर कँन्सर हॉस्पीटलची माहीती, पत्ते, अनेक डाक्टरांचे नंबर, वेगवेगळ्या टेस्ट कुठे, कशासाठी केल्या जातात व त्याचा अंदाजे खर्च इ सर्व माहीती होती. (आज हे सगळं गुगलला सहज उपलब्ध असेल पण तिनं जमवलेली माहीती इतर कोणालातरी उपयोगी पडावी हीच तिची इच्छा होती) स्वत:च्या एकुलत्या एका मुलाचं दु:ख बाजूला ठेऊन दुसऱ्याचं दु:ख डोईवर घ्यायला निघाली. धन्य ती माऊली..... अन् धन्य तिचे विचार...... आपोआपच मी तिच्यासमोर नतमस्तक झाले.



© सौ. मंजूषा गारखेडकर

Sunday, 2 August 2020

तानी

# तानी


तानी आज खुप गडबडीत होती. तिला आज इकडे तिकडे पहायलाही वेळ नव्हता. अमावस्या जवळ आली होती. अजून काहीच काम झालं नव्हतं. आज रविवार असल्याने तानी कामाला लागली होती. "ताने मी चालली व, जेवून झाकपाक करून ठिवजो, मी येता  दुपारी" तानीची माय ओरडून निघून गेली. कानीचं मात्र तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिने जुन्या प्लॅस्टीकच्या डब्यातून आणलेली माती चाळणीने दोन वेळी चांगली चाळून घेतली. नंतर तिने ती छान त्याच डब्यात भिजत घातली. सगळीकडे फीरून गोळा केलेल्या कागदाचे तुकडे फाडून चिंध्या केल्या त्याही एका डब्यात भिजवून ठेवल्या. 
            आज तिला दुसरं काहीच सुचत नव्हतं. कालच बाईंनी सांगितलं की या वर्षी तान्हा  पोळा आपण आपल्या शाळेत साजरा करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी आपली आपली बैलजोडी छान सजवून आणायची. ज्याची बैलजोडी छान सजलेली असेल त्याला आपण बक्षीस देणार आहोत. 
          तानीला माहीती होतं की आपल्याला तर लाकडी बैल घेणं परवडणार नाही. म्हणून तिने स्वत:च मातीचे बैल करायचं ठरवलं. तानी तिच्या आईची एकटीच मुलगी होती. तिचे वडिल लहानपणीच दारूच्या व्यसनामुळे देवाघरी गेले होते. तानीची माय चार घरी धुणी भांडी करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. तानी फार समजूतदार होती. अभ्यासातही पुढे असायची. नविन गोष्टी शिकायची तिला भारी आवडं. त्यामुळेच तिला मायच्या मालकीणबाईंनी रंगाची पेटी भेट दिली होती. 
       तानीला माती कधी भिजते असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी तिने ओली माती पातळ कापडातून गाळून घेतली अन् त्यात भिजलेले कागद घट्ट पिळून चागले एकजीव करून ठेवले. एक दोन  दिवसानंतर मातीतलं पाणी आटून मातीचा छान गोळा झाल्यावर तिने बैल करायला घेतले. त्यांना छान आकार दिला. त्यांना टोकदार शिंग लावले, पाठीवर छान झूल टाकली, त्यावर मस्तपैकी नक्शी काढली. दोन्ही बैल एकसारखे झाले होते. त्यावर ब्रशने पाणी लावून सारखेपणा आणला. कशी छान झाली होती बैलजोडी. तानी मनोमन खूष झाली. तिला झोपेतही बैलजोडीच दिसत होती.
         बैल वाळल्यावर तिने मालकीणबाईंनी दिलेल्या रंगांनी मस्तपैकी रंगवले. शिंगांना तिचा आवडता लाल रंग दिला. झुल तर दोन तिन रंगांनी नक्षी काढून रंगवली.  डोळे बारीक ब्रशने छान कोरीव केले. आता बैलजोडी अजूनच छान दिसायला लागली. 
          आज पोळा होता सगळ्या शेतकऱ्यांनी बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्याचा घास त्यांना भरवला तसंच तानीनेही घरात तिच्या बैलांची पूजा केली. उद्या तान्हा पोळा होता त्यामुळे ती खूष होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने फुलं गोळा केली. फुलांच्या रंगीबेरंगी माळांनी बैल सजविले अन् नविन ठेवणीतला फ्रॉक घालून तयार झाली. मनोमन ती खूष होती. शाळेच्या आवारात पोहोचली तेंव्हा तीने पाहीले, कोणाचे बैल छान चाकं लावलेले , कोणाचे विद्युत दिव्यांनी सजवलेले, कोणाचे नानाविध रंगांनी रंगवलेले तर कोणीतरी चक्क बैलाच्या वरच्या मजल्यावर महादेवाचं मंदीर बनवून महादेवाच्या डोक्यावरून गंगा वहात असलेेले बैल अाणले होते. तिचे बैल खुप लहान, चाकं नसलेेले आणि अगदीच साधे होते. त्यामुळे तिचं मन जरा खट्टू झालं. 
          शाळेच्या पटांगणावर मोठ्ठ तोरण बांधलं होतं. तिथेच सुंदर रांगोळी काढली होती. सगळी मुलं आपापले बैल घेऊन तोरणाच्या मागे उभी होती. बाईंनी सगळ्यांच्या बैलांची पुजा केली. परीक्षकांनी परीक्षण करून नंबर काढले. मग सगळ्यांना डाळ काकडीचा प्रसाद देण्यात आला. मग परिक्षकांनी निकाल जाहीर केला. आश्चर्य म्हणजे तानीने स्वत: बैल तयार केले असल्याने तिचा प्रथम क्रमांक आला होता. ती खूपच खुष झाली. मायला कधी सांगते असं तिला झालं होतं. परिक्षकांनी नारळ फोडले तसे तोरण तोडून सगळे स्पर्धक आपापले चाकाचे बैल ओढत मारूतीच्या मंदीराकडे धावत निघाले. तानीनेही स्वत:चे बैल कडेवर घेतले अन् तीही धावत सुटली. सगळेजण मारुतीच्या मंदीरात पोहोचले. तिथे पहिला पोहोचलेल्या मुलांचा नंबर देण्यात आला. मारूतीचं दर्शन घेऊन मुले घरोघरी बैलांच्या पुजेला निघुन गेली. तानी मात्र मायला सांगायला मालकीणबाईंच्या घरी गेली. माय मागच्या अंगणात भांडी घासत होती. तानीने तिला शाळेत काय काय घडलं ते सगळा वृत्तांत कथन केलल. पहिला क्रमांक मिळाल्याही सांगितलं. मायलाही खूप आनंद झाला. तितक्यात मालकीणबाई तिथे आल्या. त्यांनी तानीचे बैल पाहीले. त्यांनाही ते खुप आवडले.त्या म्हणाल्या, "अग तानी बैल आणलेस सागायचं नाही का?? आण आपण तुझ्या बैलांची पूजा करू." त्यांनी बैलांची साग्रसंगीत पूजा केली. तानीचे अन् बैलांचे फोटो काढले. मग तानीला खाऊ खायला दिला. "वत्सला तू पण ये ग", असं म्हणून काकू आत जाऊन आवरून आल्या. तानी आणि तीची माय निघणार तितक्यात सोसायटीतल्या सगळ्याजणी नटून थटून तिथे पोहोचल्या. मग सगळ्यांनी तानीच्या बैलाची पूजा केली आणि तानी व  तिच्या बैला सोबत फोटो काढले. वत्सलाबाईला बोलवायला त्या विसरल्या नाही. या सगळ्या अनपेक्षित कौतुकाने तानी भारावून गेली. तिला तर आज सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं. 

[ विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा केला जातो.]


सौ. मंजूषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करा हि विनंती

Friday, 24 July 2020

काळी

#काळी 


            मध्यंतरी मी रस्त्याने जात होते. जरा घाईतच होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे असेल पण रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती.  पुढे गेल्यावर ट्रॅफीक जामच झाला. आता वाट पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. सहजच आजुबाजुला पाहीलं. बाजूला झोपडपट्टी होती तिथे मुलं खेळत होती. जरा वेळाने त्यांची भांडणं सुरू झाली. एक मुलगा त्याच्या लहान बहीणीला "ए काळे ए काळे" म्हणून चिडवू लागला. ती चिडते हे बघुन त्याला आणखी जोर चढला. शेवटी ती रडायला लागली अन् जवळचं बायकांचा घोळका बसला होता तिथे जाऊन तिने तिच्या आईला सांगीतलं. आई लक्ष देत नाही हे बघनु मुलगी अजुनच जोर जोरात रडायला लागली. किंचाळू लागली तसा आईने तिला धपाटा घातला अन् म्हणाली, "मंग काय झालं कायी म्हनलं त..तु कायीच हाय नं.. तुया आंगाले का भोकं पडले का माय?? जाय तुया भावाले भाकर तुकडा दे." त्या आईने मुलाला रागवायचं सोडुन तिलाच धपाटे घातले. म्हणजे काय? ती मुलगी काळी आहे ही काय तिची चुक आहे का?? काय गुन्हा आहे त्यात तिचा. मुलगा तर मुलगा आई पण तिला काळी म्हणून हिणवत बघुन खूप वाईट वाटलं. असं म्हणतात आईला सगळी मुलं सारखीच असतात. पण ही आई फक्त मुलाची बाजूच घेत नव्हती तर मुलीवर अन्याय देखिल करत होती. तिचा स्वाभीमानही दुखावत होती. काय चूक होती त्या लेकराची?? ती न्यायच मागायला गेली होती ना तिच्या आईकडे?? असे प्रसंग जर वारंवार घडले तर त्या मुलीला नक्कीच नैराश्य येईल.
          हा प्रसंग जरी झोपडपट्टी मध्ये घडला तरी अापणही असे प्रसंग वेळोवेळी अनुभवत असतो. काही लोकं मुद्दाम दुसऱ्यांना खिजवण्या साठी असं काहीतरी बोलतात. "तु एवढा डार्क ड्रेस नको घेऊ तुला नाही चांगला दिसणार" असं चक्क तोंडावर बोलतात. समोरच्याला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वेदना होतील ह्याचा कधीच  विचार करायचा नाही. कसा करणार?? त्यासाठी संवेदनशिलता असावी लागते. आणि ते अशा थाटात म्हणतात की जसे काही ते स्वत: अप्सरे पेक्षाही सुंदर आणि मोनालीसापेक्षाही नितळ गोरी त्वचा लाभलेलेच आहेत जणू. आणि आश्चर्य म्हणजे यात माणसंही मागे नसतात. समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करणे हाच उद्देश असतो बहुतेकवेळा. समोरच्याला त्याच्या दिसण्यावरून, उंचीवरून, रंगावरून बोलून काय साध्य करतात लोक तेच काही कळत नाही. 
         एकदा एका लग्नात कोणीतरी एका मुलीला असचं बोलण्याचा प्रयत्न केला तर दुसरी बहीण तिच्यामागे ठामपणे उभी राहीली आणि तिने सगळ्यांना खडसावून सागितलं की, "खबरदार माझ्या बहीणीला असं काही बोलाल तर.. तिची ताई तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. तिच्यातले गुण तुम्हाला दिसले नाही का?? की चांगलं बघण्याची सवय नाही डोळ्यांना तुमच्या??" अभिमान वाटला त्या बहीणीचा. समाजात कितीही सुधारणा झाली तरी अश्या वृत्तीचे लोक सगळीकडे दिसतात. मुद्दाम चारचौघात नको असलेले विषय काढून समोरच्याला मेल्याहुन मेल्यासारखं करुन सोडणे हा त्यांचा आवडता छंद असतो. समोरच्याची ऐपत नसेल तर मुद्दाम त्याला खार्चीक सूचना देणे. तू अमुक एक वस्तू  का घेत नाही हे मुद्दाम चारचौघात विचारणे. नाहीतर आमचं इन्कम किती जास्त आहे हे लोकांना कळण्यासाठी सर्वांसमोर त्याचं वर्णन करून सांगणे. कोणाच्या घरात वाद असतील तर मुद्दाम त्याविषयीच प्रश्न विचारणे. कुणाला मुल होत नसेल तर मुद्दाम हळदीकुंकाला त्यावर प्रश्न विचारणे. कुणाचं लग्न ठरत नसेल तर दहावेळा विचारून भंडावून सोडणे ,अगदी समोरच्याला जगणं नकोसं करणे आणि न पटणारी वाट्टेल ती स्थळं सांगणे. ज्याच्याकडे जे नाही त्यावरून त्याला बोलणे हा काही लोकांचा छंदच असतो पण त्याचा समोरच्यावर किती खोल परिणाम होतो याचा ते कधीच विचार करत नाही. (त्याच बरोबर त्यांच्या मनातून तुम्ही उतरता हे ही तुमच्या लक्षात येत नाही.) अशा अनेक कारणांनी लोकांना फ्रस्ट्रेशन येऊ शकतं हे लोकांना कळायला हवं.
        लोकांना इतरांना खिजवून काय मिळतं देवच जाणे पण घरच्याच लोकांनी जर अशी   वागणूक दिली तर मुलांनी दाद तरी कुठे मागायची ??


Saturday, 18 July 2020

मुले

# मुले 


       लहान मुलांशी बोलायला मला खुप आवडतं. त्यांच्याशी बोललं की सगळे टेंशन्स विसरायला होतात. किती गोड असतात मुलं . अन् त्यात आजची पिढी तर खुपच स्मार्ट. फार हजरजबाबी आणि चाणाक्ष. त्यांचं निरीक्षणही खुप असतं. बरेचदा त्यांच्या बोलण्यातून विनोद निर्मिती होते. पण या सगळ्यात आई  वडीलांची कधी कधी फजीतीही होते.
        एकदा आमच्या शाळेतली शिक्षिका तिच्या मुलाला शाळेत घेऊन आली. मुलाचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर आत स्टाफ रूम मध्ये आला जिथे प्राचार्या मिनाझ मॅम पण होत्या. त्यानी त्यांचं नाव एेकलं अन् त्याच्याकडे हातवारे करत म्हणाला,"हिच का ती मिनाझ??" त्याच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकलीच असेल. अजून काही बोलायच्या आत ती त्याला बाहेर घेऊन गेली.
       एकदा मी गिरणीत उभी असतांना दोन लहान मुले हरभरा डाळ घेऊन आली. साधारण एक किलो असेल. पिशवित डबा ठेऊन दोन्हीकडून दोघांनी पिशवी धरून आणली होती. ते गिरणीवाल्याला म्हणाले, "लगेच दळून द्या आमच्याकडे पाहूणे आले आहेत." तो म्हणाला, "लगेच मिळणार नाही वेळ लागेल" तर ही छोटी मुलं त्याला दमदाटी करू लागली. "ओ मुकाट्याने दळून द्या. पाहूणे आले कळत नाही का तुम्हाला??" बघा ह्यांची कमाल.
        एकदा आम्ही आमच्या नातेवाईकांकडे गेलाे होतो. माझी मुलगी लहान होती. आम्ही सगळे जेवायला बसलो. अचानक ती माझ्या काकांना म्हणाली, "अो आजोबा किती  जेवताय तुम्ही??" आम्ही सगळे बघतच राहीलो. काहीतरी बोलायचं म्हणून काका म्हणाले, "अगं मी सावकाश जेवतोय म्हणून मला वेळ लागतोय." तर म्हणाली, "तुम्ही काय रवंथ करताय का? आवरा की लवकर" आता या मुलांना काय म्हणावं..
         आमच्या बिल्डींगमधली रेवाही तसलीच. एकदा सकाळी शाळेत जातांना बसजवळ कुत्र्याचं पिल्लू तिच्या मागे गेलं. आधीच उशीर झालेला. बसवाले काका घाई करत होते अन् या मॅडम त्या कुत्र्याच्या पिल्लाला ओरडत होत्या, "ए तू माझ्या बस मध्ये यायचं नाही " बोला आता..
      एकदा मी जिन्यातून जातांना मला म्हणाली," आज शाळा नाही का तुमची?" मी म्हटलं ,"आहे की. हि काय निघाले." तर म्हटली ,"आता कसं वाटलं??" म्हटलं ,"छान वाटलं. तू माझी एवढी चौकशी केली तर मला बरच वाटणार ना??" तर म्हणाली, "तुमची ताई कशी मला सारखी विचारते शाळा नाही का शाळा नाही का म्हणून.." म्हणजे तिने माझी चौकशी रागापोटी केली होती. पण हा राग नक्की कोणाचा माझा, ताईचा की शाळेबद्दलचा ते काही शेवट पर्यंत कळलं नाही.
       एकदा तर दोघी बहीणींची भांडणं झाली. रेवाच्या आईने सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती काठी घेऊन आली आणि सरळ आईला म्हणाली, "तू आधी घराबाहेर हो" बोला आता...काय म्हणायचं या मुलांना??
           आमच्या कडे उन्हाळ्यात रोज रात्री कुल्फीवाला यायचा. पत्ते खेळतांना जो हरेल त्याने सगळ्यांना कुल्फी खिलवायची असा अलीखित नियमच होता. कुल्फीवाल्यालाही सवय झाली होती. एक दिवस काही कारणास्तव कुल्फी घेतली नाही. कुल्फीवाला सारखी घंटी वाजवत होता. माझ्या लहान भाच्याने घरात जाऊन माझ्या आईला सांगीतले. आई म्हणाली, "रोज रोज नाही घ्यायची कुल्फी." इकडे कुल्फीे घेत नाही असे बघुन कुल्फीवाला फाटकाजवळ येऊन जोरजोरात घंटी वाजवू लागला. त्यामुळे भाच्याला खुप संताप आला. तो त्या कुल्फीवाल्याला चिडून म्हणाला, "जावा की आमची आजी नाही म्हण्ती." त्याने आपला राग कुल्फीवाल्यावर काढला पण कुल्फीवाला कुणावर काढणार???
          एकदा एका लग्नात एका लहान मुलाला एक पांढरे केस झालेले काका चिडवत होते की तुझे बाबा म्हातारे झाले. बराच वेळ मुलानी ऐकून घेतलं. मनातून त्याला संताप येत असावा. परत ते काका म्हणाले, "अरे याचे बाबा म्हातारे झाले." मग तो चिडून बोलला, "सी यूवर 'केस' फर्स्ट" अन्  संतापाच्या भरात त्याला केसांना इंग्रजी शब्द आठवला नसावा.
         एकदा एका शाळेत पालकांना बोलावलं. त्यांना वाटलं आपल्या मुलाने नक्कीच काहीतरी चांगलं केलं असणार त्याचं कौतुक करायला बोलावलं असेल. पण शाळेतला किस्सा ऐकून ते उडालेच. त्यांच्या मुलाला म्हणे टिचर रागवल्या म्हणून तो त्यांना म्हणाला, "तुम्ही मला ओरडलात तर मी गोळ्या घालीन तुम्हाला." 
अशी ही मुलं काय बोलतील सांगता येत नाही. 
        एकदा आम्ही ट्रेनने जात असतांना एका सहप्रवाशाचा मुलगा तर खुपच भन्नाट. तो त्रास देतो म्हणून आईने वरच्या बर्थवर बसवलं. एक विक्रेता आला त्याच्या डोक्यावरील बास्केट मधून त्याने कोल्ड्रींकची बाटली वरच्यावर घेऊन फस्त केली आणि आईला आवाज द्यायला लागला, "मम्मी.... मम्मी...." मम्मीने चक्क दुर्लक्ष केलं तर सरळ सांगितलं, " मम्मी मैने कोल्ड्रींक पी लिया है उसके पैसे दे दो." आता काय म्हणणार मम्मीजी?? त्यांचीतर बोलतीच बंद झाली. 
          अशी ही गमतीदार मुले त्यांच्या वागण्याने जसा विनोद निर्माण करतात तसचं कधीकधी पालकांच्या तोंडाचं पाणीही पळवतात.
        
     

सौ. मंजुषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करावी ही विनंती   

Monday, 13 July 2020

मामाचा गाव - भाग २

#मामाचा गाव - भाग २


भाजी मार्केटला कुणी बाजार म्हणतं कुणी मंडई. पण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. आमच्या विदर्भात त्याला बाजारच म्हणतात. लहानपणी आई बरोबर बाजारात जायला मला खुप आवडायचं. तिथे दिसणाऱ्या विविधरंगी भाज्या बघुन मन कसं प्रसन्न व्हायचं. 
       आमचे आजोबा म्हणजे नानांकडे गेलाे की मी त्यांच्या बरोबर आठवडी बाजारात जायचे. गावाकडचा बाजार तो आठवड्यातून एकदा गुरूवारी भरायचा. नानांचं घर बाजारच्या रस्त्यावर असल्याने सकाळ पासूनच वर्दळ सुरू व्हायची. त्या दिवशी नानाच्या दवाखान्यातही खुप गर्दी असायची. बाहेरच्या वाड्यावस्त्यांवरचे लोक बाजार करायला यायचे. कोणी पेशंट आजारी असले तरी जाऊ बाजारच्या दिवशी म्हणून गुरवारी दवाखान्यात यायचे. काहींची तब्येत नरम गरम असली तर तेही बाजारात आलो तर दाखवून देऊ म्हणून यायचे. त्यामुळे नानांना कधीकधी  जेवायलाही  वेळ मिळायचा नाही. नानांचं दुपारी उशीरा जेवण झाल्यावर आम्ही बाजारात जायचो. तसा बाजार खुप दुर नव्हता पण नानांना गुडघेदुखी आणि वयोमानाप्रमाणे भरभर चालता येत नसे. त्यात अनेक ओळखीचे लोक भेटायचे. "नमस्कार हो डाक्टर सायेब" म्हणून हाक मारायचे अन् विदर्भातल्या त्या टळटळीत उन्हाळ्यात मस्त गप्पा मारायचे. हा भेट तो भेट करत करत बऱ्याच वेळाने आम्ही बाजात पोहचायचो. बाजार चांगला फुलायला लागलेला असायचा. प्रत्येकाची लगबग सुरू असायची आपापलं दुकान थाटण्याची. पालं ठोकून आपापल्या भाज्या नीट मांडून ठेवायच्या , त्यावर पाणी मारायचं सगळं कसं निटनेटकं करून भाजी विकायला बसायचं. विक्रेत्यांच्या लहान मुलांचीही लुडबुड सुरू असायची. बाजार कसा रंगीबेरंगी दिसायचा. हिरव्यारंगाच्या विविध छटा असायच्या. पालकाचा कंच हिरवा तर कारल्याचा पोपटी, गवारीचा वेगळाच. तोंडल्याचा शेडींगचा हिरवा तर कलिंगडाचा काळपट हिरवा. कोथींबीर कुठेही मागे नसायची. बाजुलाच आंब्याचा पिवळाधमक रंग आणि घमघमाट सुटलेला असायचा. आंबेवाले अोरडत असायचे "घ्या रे आंबे व्हा रे लंबे". भाजी घेणाऱ्यांची वेगळीच लगबग चालू असायची. कोणी कोणी भाव करण्यात मश्गुल असायचा. मधेच एखादी वांड गाय येऊन विकायला ठेवलेली पालेभाजी उडवायची. 
           थोडं पुढे गेलं की शेव, चिवडयाची दुकानं असायची. गरमागरम शेव तळणं सुरु असायचं. तळणाचा वास सगळा आसमंत भरुन टाकायचा. शेजारच्या दुकानात आचारी मस्त गरमागरम जिलबी तळत असायचा. त्याच्या आजुबाजुला चारदोन माणसं कागदात  गरमागरम जिलबी खाण्यात मग्न असायचे. आपसात बोलायलाही त्यांना वेळ नसायचा.
       पुढे गेलं की कासाराचं दुकान लागायचं. तिथे बायाबापड्या कोंडाळं करुन बसलेल्या असायच्या. मोठाले घागरे घालून केसांना पुढच्या बाजूला चांदीचे घुंगुरांचे गुच्छ बांधनू पारंपारीक वेशभूषेत कितीतरी बायका बांगड्याच्या दुकानात दिसायच्या. त्या घुंगरांचा एक विशिष्ट मंजूळ आवाज यायचा. लहानपणी त्याचं फारच आकर्षण वाटायचं. दुकानात कितीतरी सुंदर रंगीबेरंगी बांगड्या असायच्या. पण कधी घेऊन मागायची हिम्मत झाली नाही.थोडं पुढे गेलो की विळा, कोयता, शेतीची लहान मोठी अवजारं एका ओळीत मांडून दुकानदार बसलेला असायचा. एका बाजूला कुंभाराकडचे माठ छान रचून ठेवलेले असायचे. उन्हाळ्याच्या दिवसात कुंभाराला उसंत नसायची. त्याच्या कडे सतत गिऱ्हाईक असायचं. मागच्या बाजूला माठ आणायला वापरलेले घोडे, खेचर निवांत शेपट्या उडवत रवंथ करत उभे असायचे. पलीकडच्या बाजूला पकाक पकाक असा कोबड्यांचा आवाज यायचा. तिकडे आम्ही कधी गलो नाही. 
        जसजशी उन्ह कलायला लागायची तसतशी लोकांची गडबड अधिकच वाढायची.आहे तो माल दर कमी करून खपवायचा प्रयत्न असायचा.आता सामानाची बांधाबांध सुरू व्हायची आणि एकेक जण हळुहळु मार्गस्थ व्हायला लागायचा. सगळा बाजार निर्जीव व्हायचा. आम्हीही  परत हळूहळू मार्गी लागायचो.
        बाजारातून आलो की मनाला कसं प्रसन्न वाटायचं. एवढा गोंधळ एवढा कोलाहल असूनही कधीच बाजारात जायचा कंटाळा  यायचा नाही . त्या रंगीबेरंगी बाजाराने आपलं जगही रंगीबेरंगी होऊन जायचं.
         नानांचा स्वभाव बोलका असल्याने अनेक लोकांशी गप्पाटप्पा व्हायच्या. नाना पेशाने डॉक्टर होते. मध्यम उंची , मजबूत बांधा , दिसायला गोरेपान,  तरतरीत नाक आणि हरहुन्नरी. नाना सरकारी नोकरीत असल्याने सारखी बदली व्हायची. रिटायर झाल्यावर देऊळगावला घर घेतलं अन् तिथेच स्थाईक झाले. छोटासा दवाखाना थाटला. नाना फारच उत्साही होते. गुडघेदुखीचा त्रास असूनही रोज फीरायचे. ते स्वत: अनेक औषधे घरी बनवायचे. चवनप्राश, शतावरी कल्प, डोळ्यात घालायचे ड्रॉप्स हे सगळं करायला त्यांनी आईलाही शिकवलं होतं. नवनविन गोष्टी करून पहायला त्यांना खुप आवडायचं. 
        संगीत हा एक त्यांचा आवडता विषय. वयाच्या सत्तरीतही त्यांनी संगीताच्या परिक्षा दिल्या.  त्याना हार्मोनियम वाजवता यायची. बरेचदा ते सकाळी उठुन  गायनाचा रियाज करायचे. सोबत हार्मोनियमही वाजवायचे. त्यांच्याकडे तबलाही होता. कीर्तन तर ते अप्रतिम करायचे. एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची हातोटी असल्याने कीर्तन खुप रसाळ व्हायचे. एकदा तर गावात दवंडी पिटवली गेली की, "आज देवळात ८ वा. नाना महाराजांचे कीर्तन आहे हो s s s, सर्वांनी ठीक ८ वा देवळात जमा." आम्हाला नाना महाराज कोण ते काही कळलं नाही. नाना ८ वा कीर्तनाला जायला निघाले पण त्यांचं कीर्तन आहे हे त्यांनी सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी अनेक लोकांनी सांगितलं की कीर्तन खूप छान झालं आणि विचारलं की, "नानांचं कीर्तन असून तुम्ही कोणीच का आले नाही?" तेंव्हा कळलं की कीर्तन नानांचं होतं. कधीही स्वत: बद्दल न बोलणारे असे आमचे नाना. 
          नानांचं ड्रॉईंगही अतिशय उत्तम! त्यांना मुर्तीकलाही अवगत होती. बऱ्याच वर्षांपासून दरवर्षी ते घरीच सुबक अशी गणेश मूर्ती घडवायचे.त्याला आकर्षक रंग द्यायचे. जणुकाही मुर्ती साच्यातूनच घडविली आहे असे वाटायचे. सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करायचे. देवपूजाही जेंव्हा करायचे तेंव्हा अगदी समरसून करणार. दरवर्षी रामनवमीला नानांचं कारंजा येथे त्यांच्या रामाच्या देवळात न चुकता दरवर्षी किर्तन असायचं.
        आम्हा नातवंडांचं नानांना खूप कौतुक होतं. माझा मोठा भाऊ इंजिनियर झाला मग त्याची एअर फोर्स मधे निवड झाली तर त्यांना कोण कौतुक वाटायचे. सगळ्या गावाला त्यांनी त्याचं कौतुक सांगितलं असेल. पहिल्याच नातवाचं यश बघुन ते भारावून गेले होते. 
       त्यांच्याकडे बघुन आपल्यालाही कामाचा उत्साह यायचा. त्याच्याकडे बघुन, "म्हातारा  इतुका न अवघे पाऊणशे वयमान" म्हणावसं वाटेल. नाना म्हणजे एवढा उत्साहाचा खळखळता झराच जणू! 
        नानांबरोबर संध्याकाळी आम्ही बसस्टँडवर फीरायला जायचो. रस्त्याने अनेक ओळखीचे लोक भेटायचे. आपुलकीने आमची चौकशी करायचे. गावातले सगळेच लोक चांगले होते. नानांच्या दवाखान्यात जरी आले तरी आई, मावशी यांची चौकशी केल्याशिवाय कधी जायचे नाही. कधी आम्ही आजारी पडलोच तर तांब्याभर दुध घेऊन भेटायला येणार आणि "बाई शहरातल्या पोरी, नाजुक असत्यात त्यांना सवय नसते कामाची, कोनाची तरी दिठ लागली असंल" असं म्हणून कानावर कडाकड बोटं मोडून दृष्ट काढणार. दृष्ट लागणं न लागणं गोष्ट वेगळी पण तो आपलेपणाचा ओलावा तोच मनाला भावतो.
          मला आठवतं मामाच्या लग्नाच्या वेळेला कितीतरी लोकांकडे केळवणाला आम्ही मामा बरोबर जायचो. आपल्या ऐपती प्रमाणे ज्याला जे जमतील ते पदार्थ प्रत्येकाने खाऊ घातले. पण  त्यांची ती आपुलकी, आदरातीथ्य बघुन त्या लहान वयातही भारावून जायचो आम्ही. स्वत: कडे असो नसो देण्याची वृत्ती होती. मन मोठं होतं. आज असे फारच कमी लोक पहायला मिळतात. 
     कोणाकडेही लग्न कार्य असलं की सगळा गाव मदतीला जायचा. जसं काही आपल्याच घरचं कार्य असल्यासारखे कामं करायचे. घरासमोर मांडव टाकून लग्नं व्हायची.  आजूबाजूच्या लोकांकडून भांडी आणली जायची. आजुबाजूच्या बायाबापड्या एकत्र येऊन लग्नातलं जेवण बनवायच्या. एकीचं  उत्कृष्ट उदाहरणच होतं ते. कमी खर्चातही कार्य कसं छान पार पडायचं. एकीचे बळ आपल्या वागण्यातून दाखवून दिलं त्यांनी.
          गावात रोज रात्री मंदिरात हरीपाठ वाचला जायचा. घरातली जुनी जाणती माणसं हरीपाठाला जायची. आमच्या मोठीआईला घरात एवढं काम असूनही ती हरीपाठाला न चुकता जायची. 
        गावातील शिक्षक, गोल गरगरीत माठ, नक्शीदार सुरया, कुंड्या बनविणारे कुंभारदादा, सुबकपणे सगळ्या वस्तू बनवणारे सुतारमामा, लोखंडी घण घालून अनेक वस्तु बनवणारे लोहार मामा, तर ज्वारीच्या धांड्यांपासून बैलगाडी बनवणारी लहान मुले, सगळेच आपापल्या कामात तरबेज. प्रत्येक व्यवसाय जवळून पाहण्याची संधी मिळाली. किती किती गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या. देऊळगावसारख्या छोट्या गावाने खुप काही शिकवले. कदाचीत त्या वयात त्याचं महत्त्व कळलं नसेल, पण आज मात्र कळतय. पण तेंव्हाही गाव सोडून जातांना जड मनानेच सोडावं लागायचं आणि आज म्हणाल तर शहरापेक्षा गावाचीच ओढ जास्त वाटते. गावाचा विकास झाला तरचं देशाचा विकास होणार हे नक्की. देऊळगावचा विषय निघाला की या ओळी नक्कीच म्हणाव्याशा वाटतात.
        
           गाव माझा साधा सुधा
               वाहे निर्मळ पाणी

            घरा मध्ये सुख नांदे 
            डोले तुळस अंगणी

             टाळ मृदुंगाच्या तालात
               चाले माऊलीचा जप

              माणसात देव वसे
              देव्हाऱ्यात माय बाप

सौ. मंजुषा गारखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करावी ही विनंती 

Thursday, 9 July 2020

मामाचा गाव भाग १


लहानपणी परिक्षा झाली रे झाली की मामा कडे जायचे वेध लागायचे. त्या आधीच आईच्या पापड, कुरड्या सगळं झालेलं असायचं. नागपूरहून आम्ही पॅसेंजर गाडीने निघायचो. आई, मावशी आणि आम्ही सगळे भावंड सोबत दोन लोखंडी ट्रंका, २/३ हँडबॅग , पाण्यासाठी सुरई किंवा कडीचा तांब्या इ. सगळं सामान घेऊन आम्ही स्टेशनवर दाखल व्हायचो. आमचे वडील आम्ही त्यांना दादा म्हणायचो ते आम्हाला स्टेशनवर सोडायला यायचे. तेंव्हा आज एवढी गर्दी नसायची. सगळं सामान ठेवून बसायला ऐसपैस जागा मिळायची. गाडी सुटली की दादा हात हलवत मागे जातांना दिसायचे. मग गाडीत आमचा धुडगुस सुरू व्हायचा. वरच्या बर्थवर बसून आम्ही पत्ते खेळायचो. दहा वेळा आईला पाणी माग खायला माग, वेळ कसा जायचा ते कळायचही नाही. रात्र झाली की आई बरोबर डब्यात आणलेले पराठे, काचऱ्याची बटाट्याची भाजी अन् ताजे करकरीत कैरीचे लोणचे द्यायची. जेवण झाली की गुडुप झोपायचं की सकाळी जलंब स्टेशनवर गाडी पोहोचलेली असायची. तिथे उतरायचं. प्रवासाचा एक टप्पा पार पडलेला असायचा. आता पुढची गाडी पकडणे हे उद्धीष्ट असायचं. ती गाडी कधीच वेळेत नसायची. वेळ मिळाला की डुलत डुलत यायची स्टेशनात. १०/११ वाजता त्यात बसलं की पुढचा प्रवास सुरू. सोबत आणलेल्या चिवडा आणि कणकीचे शंकरपाळे प्रवासात कधी फस्त व्हायचे कळायचं देखिल नाही. मग खामगाव आलं की उतरायचं. आता एस टी स्टँड वर जावं लागायचं. एकाने सतत एस टी च्या मागावर रहायचं. कोणी सांगितलं देऊळगावची एस टी आली की सगळ्या सामाना सकट धक्का बुक्की करत कसं बसं एस टी त चढायचं. जागा मिळेल याची कधीच शाश्वती नसायची. आत शिरायला मिळालं हेच महाभाग्य. दिवसभरातून एकच गाडी देऊळगावला जायची अन् ती ही गेली तर बोंबला. बरं त्या गाडीत चढतांना नेहमीच आमची सुरई फुटायची. देऊळगावचे रस्ते म्हणाल तर इतके भयंकर की शरीरातलं एकही हाड खिळखिळं झाल्याशिवाय रहाणार नाही. वाट पाहून पाहून कंटाळून डुलकी लागली की आई उठवायची चला आपल्याला उतरायचं आहे. संध्याकाळ झालेली असायली. मग सगळं सामान गोळाकरून एस टी गच्चकन थांबली की कोंबलेल्या त्या एसटी तून एकेकानी बाहेर येत मोकळा श्वास घ्यायचा. एस टी पुन्हा घुईं घुईं करत निघुन जायची. 
       स्टँड पासुन मामाचं घरं खुप जवळ नव्हतं शिवाय बरोेबर सामान म्हणून मामा घ्यायला यायचा. वाट पाहून पाहून मामा घरी निघून जायचा. मग कोणीतरी निरोप द्यायचा  " ए कांता तुया बयनी अाल्या" लगेच मामा गाडीला बैल जुंपुन बैलगाडी स्टँड वर घेऊन यायचा. मग त्यात ट्रंका, इतर सामान अन् बच्चे कंपनी म्हणजे आम्ही कोंबले जायचो. अन् मग चालली आमची वरात घराकडे. आई अन् मावशी पाई चालत यायच्या. गावातले रस्ते अन् आधीच खिळखिळी झालेली हाडं अन् त्यात ग्रामपंचायती जवळच्या नदीतील (उन्हाळ्यामुळे सुकलेली) गोल गोल दगडांमधून जातांना असं वाटायचं की आहे ती हाडं निसटून पडतील की काय. मग बैलगाडीतून उतरून पाई प्रवास सुरू व्हायचा.अंग धुळीनं माखलेलं असायचं. काल संध्याकाळी प्रवासाला निघालेलो आम्ही आज रात्र झाली तरी घरी पोहोचायचा पत्ता नसायचा. गावात लोकं अंगणात बाजा टाकून झोपायच्या तयारीत असायचे. गावात तेंव्हा लाईट नव्हते. लोक कंदील लाऊन गप्पा मारत बसलेले असायचे. चालता चालता कोणीतरी आपल्या तोंडाजवळ कंदील आणुन कोण आहे याचा तपास करायचे. कोणीतरी विचारायचं "कोन हाय?"  "डाक्टर सायबाच्या पोरी हायतं न शयरातून  आल्या." मग कोणीतरी "साजऱ्या हायत बाई नाती" असं म्हणत तोंडावरून हात फिरवायच्या. 
       चालत चालत रस्त्यात असंच सगळ्यांना भेटत घरी पोहोचायचं तोपर्यंत साडेनऊ दहा वाजलेले असायचे. घरी नाना (आजोबा), मोठी आई (अाजी), मामी सगळे वाट पहात असायचे. पण गावातल्या लोकांची आपुलकी अन् नाना, मोठीआई, मामा अन् मामींचं अगत्य यांनी सगळ्या प्रवासाचा शीण निघून जायचा.
    मामाकडे खुप मजा यायची. रोज पहाटे तिथे दिंडी यायची. शाळकरी मुले त्यांच्या शिक्षकां बरोबर मारूतीच्या देवळात आरती करायचे अन् मग श्लोक म्हणत गावातून प्रभातफेरी काढायचे. ती दिंडी आली कि आम्ही उठायचो मग अंगण झाडायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची. हे सगळं घरी कधी करायला मिळायचं नाही. त्यामुळे मस्त वाटायचं हे सगळं करायला. 
        नानांकडे गेलं की रोजच आमरसाचं जेवण असायचं. आमची मोठीआई चुलीवर स्वयंपाक करायची. काय चव असायची त्या जेवणाला म्हणून सांगू. पण इतक्या सगळ्यांचा चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणजे गंमत नाही हे आज कळतं. आमच्या येण्यामुळे मामीलाही खुप काम करावं लागायचं पण कधी चकार शब्दही काढला नाही मामीनी. 
      मामाची शेती होती त्यामुळे घरच्या भुईमुगाच्या शेंगा भरपूर असायच्या.घरी दोन तीन म्हशी होत्या त्यामुळे दुध, तूपाची काही कमी नसायची. आम्ही कधी कधी मामा बरोबर जायचो जनावरांच्या वाड्यात मामा दुध काढायला जायचा तेंव्हा. रोज रात्री आम्ही गच्चीवर झोपायला जायचो . मग तिथून  सप्तर्शी , शुक्र तारा बघत बघत झोपी जायचो. रात्री छान वाऱ्याची  झुळुक यायची. खुप छान होते ते दिवस. आजच्या A C ला ही त्याची सर येणार नाही.
      आमचे आजोबा म्हणजे नाना डॉक्टर होते त्यामुळे सकाळ संध्याकाळ दवाखान्यात पेशंट यायचे. गावात सगळे लोक ओळखीचे त्यामुळे दवाखान्यात मस्त गप्पा रंगायच्या. गावातल्या लोकांची खुप माया असायची. कोणी घरचं तांब्याभर दुध, कोणी घमेलंभर शेंगा, कोणी आंबे पाठवायचे आमच्यासाठी अन् चहाला बोलवणाऱ्यांची तर गिनतीच नसायची.
     बघता बघता सुट्टया संपत यायच्या अन् घरी जाण्याचे वेध लागायचे. मग मोठीआई घरच्या डाळी, शेंगा, तूप, पापड, लोणचं या सगळ्यांची बांधाबांध करायची आणि महिना दोनमहिने राहून तुप रोटी खाऊन छान गलेलठ्ठ झालेलो आम्ही घरी परतायचो.
       यासगळ्या आजोळपणात मामा-मामीचं खुप मोठं योगदान असायचं. ते आमच्यासाठी जे काही करायचे ते शब्दात सांगण अशक्यच. आज नाना , मोठीआई याजगात नाही पण ते मनात घर करून राहिलेले दिवस कधीच विसरता येणार नाही. अजुनही मी  देऊळगावच्या आठवणी रोज माझ्या लेकीला एेकवते अन् तीही आवडीने ऐकते.


सौ. मंजूषा गाखेडकर
पोस्ट आवडल्यास कृपया नावासकट शेअर करा