# बंडी उलार
परवाच्या दिवशी बापूराव आलते. ते माह्या बुढ्याले म्हने का बाप्पा पोराचं लगन करतु का न्हाय? माहा बुढा काई नावंच नाई काढे. बापुराव म्हने का पोरगं कमावते तं काहून न्हाई करत लगन? पायजा बापा नाईतर थ्योच ईल ठरून. मंग बसाल बय बय करत. बुढा आयकत हुता. मंग इचार करून म्हने का करून टाकू काय कराचं. म्या सारं आयकत व्हतो. माह्या तं मनात उकळ्या फुटत व्हत्या. चाला म्हनलं....बुढा लग्नाले तयार तं झाला....बापुरावनं बुढ्याले यका पोरीचा फटू दाखवला. बुढ्यानं फटू पायला अन् म्हने का बापुराव, "पोरगी कधी पाहाची, ते ठरूनच टाका.” मले तं वाटे का आत्ताच जाऊन पोरगी पाहून याव. पन माहा बुढा लयच खऊट. मले तं त्यानं फटू बी नाई दाखवला.
बापुरावनं पोरगी पाहाचा कारेक्रम ठरून टाकला . येनाऱ्या इतवारी ठरला. मले वाटे बापा इतवार येते का नाई ? म्या म्हनतो इतवारची वाटच कायले पाहा लागते ? आजच जाऊन पोरगी पाहाची अन् टाकाचं ठरून . मंग उशीर च उशीर होत जाते. पन ह्या बुढाले सांगन कोन?? त्याले टाईम नसन तं म्याच आलो असतो पाहून. इतवार आला कसाबसा. मंग म्या.... माई माय.... माहा बुढा.... सरसोती मावशी....बापुराव.... माहये दोन भाऊ आन् माही बईन अन् जवाई आन् दोनचार लहान पोरं गेलो पोरगी पहाले. म्या तं मस्त पांढऱ्या रंगाची प्यांट अन् गुलाबी शर्ट घातला. अन् आरसा घिऊन न्हानीघरात गेलो. अन् तिथं तोंडाले किरीम गिरीम लावली अन् पावडरई लावलं. कालच्यालाच माह्या दोस्तानं फेशियल का काय ते पन करून दिलतं. आज म्या तं मस्त घोटून दाढी केली. म्हनलं पोरीनं म्हनलं पायजे का पोरगं त लईच मस्त हाय.
मंग आमी सारेजन पोरीच्या घरी गेलो. त्यांच्या घरी बिछाईत गिछाईत करून ठेवली होती. सारेजन बसले खाली बसले बिछायतीवर. बापा अन् मलेच बसायले जागा न्होती. मंग म्या उभाच रायलो. तं पोरीच्या बाप म्हनते का बसानं तुमीबी त्यानं मले खुर्चीच आनुन देल्ली. सारे खाली बसले न् नवरदेव खुर्चीवर. माह्या बाजूले बी यक खुर्ची ठिवली तं मले वाटे का पाेरीनं इथच बसाव. मले तं लग्नात बसल्यावानी वाटे.
सारेजन बोलत व्हते न् म्या नुसताच बसून व्हतो. तं आतून एक पोरगं आलं. इऊन माह्या बाजूच्याच खुर्चीत बसलं. म्या म्हनलं ह्याले हेच जागा भेटली का? पन मी म्हंतो याचं हितं कामच काय हाय? बसलं तं बसलं. माह्याशीच बोले. तुमी काय शिकले? कुठं नोकरी करता? मी म्हनतो याले कराचंच काय? पोरगी बी येत न्हवती. त्या पोराचे केस तं पोरी सारखेच होते बापा. बापकट का काय म्हनते तसे. अन कानातई डूल व्हते. मले तं ते पोरगं हिलन वानी वाटे. शिनेमात नसते काय हिरो हिराईनच्या मधी मधी करते तसं. हिलन म्हनाव त नाजुकई वाटे. त्या पोरानं मले इचारलं , "काऊनजी तुमाले सैपाक गिपाक येते का नाई? बायकु बेमार पल्ली तं?” मले त वाटे का उठून त्याच्या कानशिलात द्याव पन काय करता , लगन करायचं व्हतं नं. म्या म्हनलं, “ नाई बा आपुन सैपाक गिपाक नसतो करत. हाटेलात जाऊन जिवून इऊ.”
थे पोरगं लयच चबर चबर करे आन् मले प्रश्न ईचारे.....मले बोलाचं नव्हतो तरी येऊन जाऊन माह्याशिच बोले.असं वाटे का त्याले मनाव का जाय ना तुले काई कामं धंदे नही काय??? पन.....
थोडा येळ झाला तसा बुढा म्हने का, "आना पोरीले भाईर". तं पोरीचा बाप म्हन्ते का, "ते काय आमची पोरगी पोराच्या बाजूलांच तं बशेल हाय. आमची पोरगी चांगली शिकेल हाय. बी.ए झालीना थे.” आमी तं हपचकच झालो बापा. थ्यो पोरगा वाटला थेच पोरगी होती. म्याच तिच्याकडे पाहून लाजत जाओ मंग. मंग म्या तिले टक लाऊनच पहात जाओ. माह्या बुढ्याले काई थे पोरगी पटलीच नवती. तिची ती फ्याशन का काय बुढ्याले नवतीच आवडली. बुढा तिले इचारे "काहून तुमच्या कालेजात हेच शिकोते काय? " तं ते पोरगी म्हनते , “त्याले फ्याशन म्हनते. ते तुमाले नाई समजनार. त्याले कालेजात जा लागते.” मंग बुढ्याचं डोसकच फीरलं. पन मले तं पोरगी लईच भायली. मले वाटे का पोरीले घिऊन फिराले जाव. माही बईन इचारत व्हती पोरीले का, “ तुले काय काय आवडते?” तं पोरगी म्हने, “ मले तं शिनेमा पहाले, फिराले, अन् फ्याशन करालेच आवडते बाप्पा.” तं माहा बुढा खवळलाच, म्हने का पोरगी काई सरळ दिसत नाई. माहा जीव तं खालीवर व्हये. मले तं पोरगी लयच भायली व्हती ना. म्या मनातंच म्हनलं अशी पायजे बां पोरगी हिराेईनी वानी. माया सारख्या हिरोले तं हेच शोबते.
बोलता बोलता आमच्या साठी पोयाच्या बशा भरून आल्या. पोरं लई दांगडो करत व्हते. त्यानले लयीच मजा येत व्हती.... आमच्या मामाचं लगीन हाय म्हनून लयीच हरखली व्हती. ईकून तिकून पयत व्हते. तितक्यात यक बाई पोयाच्या बशा घिऊन आली. तं त्यायच्या कडच्या पोराचा लागला धक्का आन सगया पोयाचा सत्यानाश.....सारा जनु पोयाचा सडाचं पल्ला. माया बुढ्याले तं लईच संताप आला.... पन तो गप गुमान बसला.... पन थ्या पोरीच्या बापानं थ्या पोराले दिली थोपकाडीत लाऊन. मंग ते पोरगं लागलं बोंबलाले मने साऱ्या लोकाई समोर माया वाला अपमान केला तुमी. अन् लागला लाथा झाडाले. त्यानं तं च्या च्या कपाले देल्ली लात झाडून.त कप डायरेक बुढ्याच्या आंगाव आला. आता बुढ्याचा संताप इचरूच नका. बुढ्याचं तोंड सगर भाजलं.... मंग सारे बुढ्याकडे वयले. कोनी म्हने ठंड पानी मारा तं पोरीच्या भावानं बुढ्याच्या तोंडाव ठंड पानीच फेकलं. बुढा लईच खवयला. बुढा संतापानं लालेलाल झाला. मने ईथ थांबाचच नाय कोनी चाला आता...बुढ्याचे सारे कपडे वल्ले झालते. मंग त्यो खवळनार नाय तं काय?? पन तरी मले वाटे का इथच थांबाव. मंग थ्या पोरीच्या बापान बुढ्याले त्याच्यावाले कपडे देल्ले बदलाले. तं बुढा म्हने की मी नसतो घालत लोकाईचे कपडे. मंग त्यायनं यक नविन धोतराचं पान देल्ल बुढ्याले नेसाले अन् पोरीच्या भावाचा सदरा देल्ला. त्यो ढगाळ घालून बुढा तं निव्वळ बुजगावन दिशे. मले तं त्याले पायलं तं हासूच ये. संतापलेल्या बुढ्याले पोरीच्या बापानं लई समजावलं मंग त्यो जरा शांत झाला. मंग कोनतरी गायीचं तुप फासलं बुढ्याच्या तोंडाले.पोरांचा दांगडो तं काई कमीच व्हत नवता. मंग बुढा लयच भडकला. मंग आलो आमी निघुनशान घरी.
घरी आलो तं बुढा बापुराव वरंच गरम झाला. काई पोरी दाखवता तुमी तं. पयले सांगतलं असतं तं आलोच नसतो पोरगी पहाले. कोनालेच पोरगी पसंत पडली नाय. मंग माहं तोंडच उतरलं. तशी बुढी म्हने पोराले तं इचारा काय म्हंते तं. बुढा म्हने पोराला कायले इचारा लागते. आपुन ठरू ते पोरगा करन. मंग म्याच म्हनलं, " म्या लगन करन तं थ्याच पोरीशी नाईतर म्या नाई करनार.” म्या असं म्हनलं तं बुढा आंगावर धाऊनच आला. मंग म्या गेलो निघुन घरातून. जाऊन बसलो डोंगरावरच्या रानात. मले तं सारीकडे हिरवं हिरवंच दिशे अन् शिनेमातल्या वानी फुलं दिशे. आनं ते पोरगी गानं म्हने “परदेशी परदेशी जाना नही”. अन् म्या गेलो धावतच पोरीच्या मांगं मांगं. जवा समोरच्या बाभळीच्या झाडावर आपटलो न् नाक ठेचलं तवा समजलं का हे काई शिनेमातलं बगीचा न्हाई. राती पावतो तिथंच बसलो. पोटात लय कावळे कोकलत व्हते पन समोर पोरगी दिसली का मले थंड थंडंच वाटे. रातचाला गेलो घरी. सारे कामातच व्हते. म्या उशीत तोंड खुपसून झोपूनच रायलो. मग माय आली चल बाबु भाकरतुकडा खाऊन घे म्हनून सांगायले. पोरगं सकायपासून उपाशी हाय. म्या म्हनलं मले न्हाई जेवाचं. पयले थ्या पोरीशी लगन ठरून दे मंगंच म्या जेवन. म्या नाई जवलो तं बुढी बी उपाशीच झोपली. म्या तं राती मस्त सपान पायलं. बुढा - बुढी राती जागेच व्हते. कायतर खुसूरपुसूर करत व्हते. रातो गुपचूप जाऊन भाकर खाव म्हनलं तं , हे जागेच.
म्या सकाय वकाय उठलो न् मायले म्हनलं जातो म्या घर सोडून. मले नाई रहाचं ह्या घरात. तं बुढा म्हनते, “ काऊन, जास्तं माज आलां का? माज आला अशीन तं जाय, राहाशीन तं तथ्या पोरीशी लगन लावून देतो.” राती बुढीनं बुढ्याले समजावलं का पोरगी कशीई असली तं इथं आली का सुधारून घिऊ. बुढा कसाबसा तयार झाला. मले तं बुढा तयार झाला उडावंच वाटे. वाटे आत्ताच लगन करून यावं.
बुढ्याने मंग बापुरावले सांगावा धाडला. बापुराव आल्यावर त्याईले सांगतलं का पोरगा तं म्हनते का थेच पोरगी पायजे. तुमी असं करा पोरीच्या घरी जाऊन सांगा आमाले पोरगी पसंत हाय. मंग टीळा ठरून टाकू. बापुराव तं पाहातच रायले. थे गेले पोरीकडं. तिथं बोलून गिलून घराकडे येताना दिसले. म्या म्हनलं टीळ्याची तारीखई ठरून आले असन. म्हनून म्या कान दिऊन आयकत व्हतो. तं बापुराव म्हने का, “ पोरीले पोरगं पसंत नाई. थे म्हनते का त्या पोराले काई समजतच नाई.”
मले तं थोबाडीत मारल्यावानीच झालं. मंग माहा बुढा मले म्हनते का, " करनं बाबु लगन थ्याच पोरीशी लगन, आता काहून तोंड वेंगाडून बसला?”
झाली ना माही बंडी उलार!
सौ मंजूषा गारखेडकर ©®